महाराष्ट्र दिनी यवतमाळात शिवसेनेतर्फे भव्य आयोजन
यवतमाळ प्रतिनिधी
यवतमाळ : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रक्तपेढीत हा उपक्रम पार पडणार आहे.
उन्हाळ्यात रक्ताची तीव्र गरज
उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा ही गंभीर समस्या निर्माण होते. वाढत्या उष्णतेमुळे रक्तदान शिबिरे कमी प्रमाणात आयोजित होतात. परिणामी, थॅलेसेमिया रुग्ण, अपघातग्रस्त तसेच शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना रक्तासाठी मोठी धडपड करावी लागते.
ही गरज ओळखून सुमारे १५ वर्षांपूर्वी शिवसेनेतर्फे या रक्तदान शिबिराची परंपरा सुरू करण्यात आली. आजपर्यंत हजारो रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला असून यंदा शिबिराचे १६वे वर्ष साजरे होत आहे. यावेळी सुमारे १००० रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प आहे.
सामाजिक बांधिलकीची परंपरा
पालकमंत्री संजय राठोड हे राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि युवकांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी गरजूंना मदतीचा हात दिला आहे.
आरोग्य क्षेत्रातही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिवसेनेच्या रुग्णसेवकांमार्फत सातत्याने सेवा दिली जाते. ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ते स्वतःही रक्तदानात सहभागी होतात.
रक्तदात्यांचा सन्मान
१ मे रोजी आयोजित या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याचा शिवसेनेतर्फे सन्मानचिन्ह व विशेष भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका व शहर प्रमुख, महिला आघाडी तसेच युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक आणि युवकांनी या सामाजिक महायज्ञात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन पश्चिम विदर्भ सह संपर्कप्रमुख पराग पिंगळे,जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर मोहोड, जिल्हा प्रमुख यशवंत पवार, जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, जिल्हाप्रमुख राजुदास जाधव, जिल्हा समन्वयक संजय हातगावकर, शिवसेना रुग्णसेवक विकास क्षिरसागर व महिला आघाडी व युवासेना प्रमुख पदाधिकारी यांनी केले आहे.